पिंपरी, दि. १५ : राजगुरूनगर परिसरात खासगी शिकवणीच्या वर्गात धक्कादायक घटना घडली आहे. शिकवणी सुरू असताना एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील एका खासगी शिकवणी वर्गात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित सर्व अल्पवयीन विद्यार्थी एकाच वर्गात शिकवणी घेत होते. शिक्षक अध्यापन करत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार शिक्षकाच्या समोरच घडल्याने वर्गात एकच गोंधळ उडाला आणि विद्यार्थ्यांची धावाधाव झाली. प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलांच्या टोळक्यातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हल्ला केल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगा दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला असून राजगुरूनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. हल्ला झाल्यावर त्याची प्रकृती गंभीर होती, अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलांमधील वाद इतक्या टोकाला जाईल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.
दरम्यान, ही घटना केवळ आपापसातील वादातून घडली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत असून पुढील तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मुलांकडे धारदार शस्त्रे कशी येतात, याकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दप्तरांची नियमित तपासणी गरजेची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.












































