क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

0
307

काळेवाडी, दि. ०६ (पीसीबी) – क्रेडिट कार्डचे काम करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची दोन लाख 24 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पवनानगर काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी चार ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर गोविंद पाटील (वय 42, रा. काळेवाडी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश विष्णू पाडाळे (रा. लोणावळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचा मित्र राजेश जाधव यांनी फिर्यादी आणि आरोपी आकाश यांची ओळख करून दिली. आरोपीने तो फ्युचर ग्रुप व क्रेडिट कार्डचे काम करीत आहे. क्रेडिट कार्डशी संबंधित काही काम असेल तर मला सांगा, असे फिर्यादी पाटील यांना सांगितले. त्यानुसार पाटील यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचे पैसे भरून देखील जास्त बिल दाखवत असल्याची अडचण आरोपीला सांगितली. ती अडचण सोडविण्यासाठी आरोपीने पाटील यांचे क्रेडिट कार्ड स्वतःकडे घेतले. त्यानंतर पाटील यांच्या क्रेडिट कार्डवरून 21 हजार 287 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावाने फ्लिपकार्ट वरून बजाज फायनान्सचे ऑनलाईन कर्ज घेतले. त्याद्वारे 95 हजार 163 रुपये किमतीचा आरोपीने टीव्ही खरेदी केला. त्यानंतर पुणे मुंबई महामार्गावर चिंचवड येथील रिलायन्स डिजिटल मधून फिर्यादी यांच्या नावे एचडीएफसी बँकेचे लोन करून एक लाख सात हजार 899 रुपये किमतीचा आयफोन खरेदी केला. आरोपीने फिर्यादी पाटील यांची एकूण दोन लाख 24 हजार 309 रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.