क्रूरतेचा कळस ! पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीवर मुख्याध्यापकाने केला बलात्काराचा प्रयत्न; आरडाओरडा केला म्हणून गळा दाबून केली हत्या

0
110

गुजरात, दि. २३ (पीसीबी) : अवघ्या सहा वर्षांच्या पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीची तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकानं गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील ही घटना आहे. या मुख्याध्यापकानं त्याच्या कारमध्येच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर तिला गप्प करण्यासाठी मुख्याध्यापकानं तिची गळा दाबून हत्या केली. नंतर शाळेच्याच मागच्या बाजूला तिचा मृतदेह फेकून दिल्याचा घटनाक्रम पोलीस तपासात उघड झाला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं पोलिसांच्या माहितीनुसार दिलेल्या वृत्तामध्ये या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडण्यासाठी या चिमुकलीची आई तिला घेऊन निघाली असता शाळेचा मुख्याध्यापक त्याच्या गाडीतून शाळेत जात होता. तेव्हा मुलीला आपण सोडतो, असं म्हणून त्यानं त्या चिमुकलीला कारमध्ये बसवलं. आईनंही विश्वासानं मुलीला मुख्याध्यापकासोबत पाठवलं.

दरम्यान, मुख्याध्यापकानं वाटेतच कारमध्ये त्या चिमुकलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं विरोध करत आरडाओरड करायला सुरुवात केली. ते पाहून तिला गप्प करण्यासाठी नराधम मुख्याध्यापकानं त्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे या नराधमानं दिवसभर त्या चिमुकलीचा मृतदेह आपल्या गाडीतच ठेवला. शाळेत पोहोचल्यावर दिवसभर त्यानं त्याची नेहमीची कामंही केली. शाळा सुटल्यानंतर त्यानं मुलीच्या चपला आणि दप्तर अनुक्रमे वर्गाच्या बाहेर आणि वर्गामध्ये बाकावर ठेवलं. नंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या मागच्या बाजूला फेकून दिला.