क्रुरतेचा कळस ! मुलीने झोपेत लघुशंका केली म्हणून सावत्र आईने गालावर, तोंडावर, गळ्याजवळ, गुप्तांगाला….

0
123

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) :  कोल्हापुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरुन सावत्र आईनेच अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरातील कासारवाडी येथील हा प्रकार असून यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाच वर्षांच्या चिमुरडीने अंथरुणात लघुशंका केल्याने सावत्र आईने लेकीला उलथण्याने चटके दिल्याचा संतप्त प्रकार घडला आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलीचा छळ केल्याप्रकरणी सावत्र आईच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हातकंणगले येथील कासारवाडी येथील ही घटना आहे. सावत्र आईचे नाव पुजा शुभम मगरे (वय 23) असं आहे. तर, पुजाविरोधात मुलीचे वडील शुभम मोकिंदराव मगरे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसारच पुजावर कारवाई करण्यात आली आहे. शुभम व पुजा दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. दोघांनाही पहिल्या लग्नापासूनची अपत्ये आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या मुलीचे वडील शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा सावत्र आई व मुलगी दोघीच घरी होत्या. चिमुकली झोपली असताना तिने झोपेतच अंथरुणात लघुशंका केली. त्यामुळं पुजा हिला राग अनावर झाला. रागाच्या भरात तिने मुलीच्या गालावर, गळ्याजवळ, ओठांजवळ चटके दिली. पुजा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने चिमुरडीच्या गुप्तांगाजवळदेखील उलथणे तापवून चटके दिले. यात पाच वर्षांच्या चिमुकली गंभीररित्या भाजली आहे. मुलीचे वडिल घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मुलीच्या वडिलांनी आईविरोधात पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत. जखमी मुलीचे वडील शुभम मगरे सध्या कासारवाडी इथं राहात असून त्याचे मुळगांव जालना जिल्ह्यातील शहापूर धांडेगाव आहे. या घटनेने परिसरात मात्र एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. सावत्र आईला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.