क्रिकेट खेळताना वाद; तरुणाचा पाठलाग करत कोयत्याने वार करून खून

0
653

नाणेकरवाडी, दि. १७ (पीसीबी) – क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. रक्ताने माखलेला तरुण जीव वाचविण्यासाठी धावत असताना त्याचा पाठलाग करून पुन्हा कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता नाणेकरवाडी येथे घडली.

आकाश बापू बनसोडे (वय २५, रा. खराबवाडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर बापू बनसोडे (वय २१) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश उर्फ प्रशांत बाळू फड, सम्यक दिलीप गणवीर, भीमराज मारुती कांबळे आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बनसोडे आणि आरोपी हे शनिवारी सायंकाळी नाणेकरवाडी मधील जंबुकरवस्ती येथील कुशल स्वर्णाली साईट जवळ क्रिकेट खेळत होते. खेळताना आकाशने आरोपींना शिवीगाळ केली. त्या कारणावरून प्रथमेश आणि सम्यक या दोघांनी आकाशवर कोयत्याने वार केले. तर भीमराज आणि अल्पवयीन मुलाने आकाशला लाकडी दांडक्याने डोक्यावर, हातावर, चेह-यावर मारून गंभीर जखमी केले.

रक्ताने माखलेला आकाश जीव वाचविण्यासाठी रस्त्याने धावत सुटला. तो पिंटू जंबुकर यांच्या घरासमोर जाऊन पडला. त्यावेळी आरोपी तिथे गेले आणि त्यांनी आकाशवर कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारून त्यास ठार मारले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.