क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलची मान्यताही बोगस

0
204

शाळेतील विद्यार्थिनींशी लगट करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक असलेल्या नौशाद शेखची क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ही संस्था बोगस असल्याचे समोर आले आहे. या शाळेने मान्यतेचे बनावट पत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने रावेत पोलीस ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे द्वारे संचलित क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेला सीबीएससी मंडळाची संलग्न करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे. मात्र या शाळेतील अज्ञातांनी उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीचे एक बनावट पत्र तयार केले आणि त्या शाळेला सीबीएससी मंडळाची मान्यता असल्याचे भासवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नौशाद शेख याचा प्रताप समोर आल्यानंतर पालिकेने शाळेच्या बांधकामाबाबत चौकशी केली असता शाळेचे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पालिकेने अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवत कारवाई केली. त्यानंतर शाळेला असलेल्या मान्यतेबाबत देखील चाचपणी केली असता शाळेला सीबीएससी मंडळाची कोणतीही परवानगी नसून तसे बनावट पत्र सादर केल्याचे निदर्शनास आले आहे.