ठाणे पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या
पुणे, दि.21 (पीसीबी)
क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या 2 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या तोतया अधिकाऱ्याने तब्बल 56 जणांना गंडा घातला होता. त्यामध्ये ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश होता. तोतया पोलीस अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथून अटक केली आहे.
रौचक अजयकुमार श्रीवास्तव (वय 29, रा. लखनऊ, उत्तरप्रदेश), संदिप कमलेशसिंग यादव (वय 26, रा. हरदोई ग्रामीण, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली व्यंकटेशानंद घाट यांचे वडील सदानंद रामचंद्र पाध्ये (वय 86, रा. रहेजा गार्डन वागळे इस्टेट ठाणे) यांना राकेश सिंग नावाच्या क्राइम ब्रांच मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रीचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तुमच्यावर नरेश पांडे यांनी अटक वॉरंट जारी केले असल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी तसेच निर्दोष सर्टिफिकेट देण्यासाठी सदानंद पाध्ये यांना आठ लाख 65 हजार 153 रुपयांची आरटीजीएस करण्यास सांगत आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी सोनाली घाट यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाली असल्याने वागळे इस्टेट पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची माहिती काढली. त्यामध्ये आरोपी लखनऊ उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अतुल जगताप यांचे एक पथक लखनऊ येथे पाठविण्यात आले. पथकाने लखनऊ येथे शोध घेत रौचक आणि संदीप या दोघांना 14 डिसेंबर रोजी अटक केली. न्यायालयाकडून आरोपींचा ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना ठाणे येथे आणले.
ठाणे येथील ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून मिळवलेल्या रकमेपैकी पाच लाख पासष्ट हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली. तसेच 5 मोबाईल, कार, बॅग, एअरटेल कंपनीचे 6 सिमकार्ड वेगवेगळया कंपनीचे 20 डेबिट कार्ड, बँकांचे वेगवेगळया खात्याचे 09 चेक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासामध्ये आरोपींकडे आढळलेल्या बँक खात्यात द्वारे 59 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपींनी फसवणूक करून मिळवलेली रक्कम क्रिप्टो करन्सी मध्ये परावर्तित केली आहे. आतापर्यंत 4000 क्रिप्टो करन्सी (USDT) अंदाजे 3.20 लाख इतक्या रकमेचा शोध लागला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण माने, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगताप, पोलीस हवालदार गावडे, शिरसाठ, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस शिपाई वाघमारे, महिला पोलीस शिपाई पटेल यांनी केली.