क्रांती दिनाचे औचित्य साधून क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समुह शिल्पास पुष्पहार अर्पण

0
312

पिंपरी, दि. ९(पीसीबी) – स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राजवटीत देशप्रेमाने प्रेरित होऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक, देशभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करून या थोर क्रांतिकारांच्या देशभक्तीचा वारसा सर्वांनी पुढे चालू ठेवावा असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले तसेच येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहनही त्यांनी केले.

क्रांती दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज चिंचवड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर माझी माती माझा देश या उपक्रमातंर्गत क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समुह शिल्पास आमदार उमा खापरे तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी नगरसेवक शंकर जगताप, विलास मडिगेरी,नामदेव ढाके,सचिन चिंचवडे, राजू दुर्गे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, संतोष कांबळे, विठ्ठल भोईर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, अश्विनी चिंचवडे, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश कुलकर्णी, काळुराम बारणे, राजेंद्र चिंचवडे, प्रशांत अगज्ञान, जयंत कुलकर्णी, विनोद तापकीर, अजित कुलथे, सिद्धांत चिंचवडे, शुभम डांगे, रविंद्र देशपांडे, रविंद्र प्रभुणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान संपुर्ण देशात राबविण्याच्या भारत सरकारच्या सूचना आहेत. महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर व्यक्तींच्या नावांचा शिलाफलक लावण्यात येणार आहे. शहरात वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृतवाटीका तयार करण्यात येणार आहे. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिक, सैनिक, पोलीस दलातील जवान यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. १६ ते २० ऑगस्ट दरम्यान प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून हा कलश स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करण्यात येणार आहे. आपल्या शहरातील आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी तसेच या मातीसाठी झटणाऱ्या, वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून आयुक्त सिंह यांनी शहरातील नागरिकांनी या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही केले.

आज चिंचवड गांव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपुर्तीच्या पार्श्वभूमीवर “माझी माती माझा देश” या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी “आम्ही शपथ घेतो की,भारतास २०४७ पर्यत आत्मनिर्भर आणि विकसीत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू,देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू,भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणा-यांप्रती सन्मान बाळगू तसेच देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ घेतली.जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी पंचप्रण शपथेचे वाचन केले.

माझी माती माझा देश अभियानातंर्गत महानगरपालिकेच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी सकाळ सत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पंचप्रण शपथेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, नागरिक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे.