कौशल्य विकासाने तरुणाईत आत्मविश्वास आणि रोजगाराच्या नव्या संधी – निळकंठ पोमण

0
3

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी कौशल्यम लाइटहाऊसमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी, दि. २५ ‘कौशल्य हे फक्त नोकरी मिळविण्याचे साधन नाही, तर आत्मनिर्भरतेचा ठोस पाया आहे. प्रशिक्षणाद्वारे तरुणाईत आत्मविश्वास वाढतो, रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होतात आणि उद्योजकतेची दालने खुली होतात,’ असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “कौशल्यम” लाइटहाऊस प्रकल्पांतर्गत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापालिकेचे नगर सचिव मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सीएसआर मुख्य सल्लागार विजय वावरे, लाइटहाऊसचे समन्वयक लखन रोकडे आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाइटहाऊसच्या वतीने ‘कौशल्यम’ या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील तरुणाईसाठी विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. संवादकला, तंत्रज्ञान, उद्योजकता, सेवा उद्योग अशा विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, त्यापैकी अनेकांनी रोजगाराच्या संधी मिळविल्या किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या. काहींनी प्रशिक्षणानंतर पहिली नोकरी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला, तर काहींनी मिळालेल्या कौशल्यांचा उपयोग करून लघुउद्योजकतेच्या वाटचालीला सुरुवात केली. या अनुभवकथनांमुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.

पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाईला संधी दिल्यास ते समाजातील सकारात्मक बदलाचे मोठे वाहक ठरू शकतात. समाज विकास विभाग व लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन ‘कौशल्यम’ हा प्रकल्प शहरातील युवकांना एक दिशा देण्याचे काम करीत आहे.
– निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ‘कौशल्यम’ उपक्रमातून शहरातील तरुणाई अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होत आहे. हा उपक्रम शहरातील प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आहे.
– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका