कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम शक्य, कंपनीची न्यायालयात कबुली

0
355

करोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्याने आता जगभरात याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोव्हिशिल्ड ही लस तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील नागरिकांना देण्यात आली होती.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्पपरिणाम क्वचितच आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.