कोल्हे याना स्टार प्रचारक यादीतून वगळले.

0
378

पुणे, दि. १७ (पीसीबी) : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्टार प्रचारकांची यादी आपल्या अधिकृत ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान यांच्यासह ३१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही. २०१९ मध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रा काढून सुमारे १०० मतदारसंघ पिंजून काढले होते. शिवाय, त्यांच्या वक्तृत्वामुळे लोकांचाही राष्ट्रवादीला वाढता पाठिंबा मिळाला असल्याचे समोर आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांना गणले जाऊ लागले होते. मात्र, आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे कोल्हेंच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून व्यवस्थित वागणूक मिळत नसल्यामुळे डॉ. कोल्हे हे नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. शिवाय, शिर्डीला पक्षाची मंथन बैठक झाली. त्यातही ते उपस्थित राहिले नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आता राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमधूनही कोल्हे यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा

काही दिवसांपासून शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याला त्यांच्या देहबोलीवरून पुष्टीही मिळत आहे. राजकीय परिस्थितीही तशीच निर्माण होऊ लागली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोड्यांमुळे वैतागलेल्या खासदारांना कमळाने अलगदपणे गळाला लावले आहे. येत्या काही दिवसांत हेच घड्याळ कमळाबाईंच्या घरात स्थिरावणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील सख्य तर सर्वांना माहीतच आहे. आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे आढळराव-पाटील यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न तडीस लावण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यातच राज्यातील सत्तांतर हे आढळराव पाटील यांच्या पत्त्यावर पडले आहे. कारण त्यांनी थेट शिवबंधन काढून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गती न मिळालेल्या प्रकल्पांनाही त्यांनी गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे डॉ. कोल्हे हे मतदारसंघात हजर राहत नसल्यामुळे लोकांची, विशेष करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी पोदेवाडी गावच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे गैरहजर राहिल्याने माजी सरपंच अनिल वाळुंज यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कोल्हेंनी डागडुजी केली. पण कितपत त्यात यश मिळेल हे समजेलच.