कोल्हापूर सभेतील उद्धव ठाकरेंची पाच आश्वासने बाजी पालटणार ?

0
67

कोल्हापूर, दि. 05 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत जनतेवर आश्वासनांची लयलूट केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका करताना राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत असताना उद्धव ठाकरे यांनी दिलेली 5 आश्वासनं गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

1. राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

2. पोलीस ठाण्यात गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.

3. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर तुमचा हक्क आहे. आगामी काळात मविआची सत्ता आल्यास आम्ही धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

4. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

5. आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोदी-शाहांनी 15 दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे, उद्धव ठाकरेंचा टोला
जे अडीच वर्षे भोगत आलो ते आज मांडायला आलो आहे. या सरकारने जिथं मिळेल तिथे खायला यांनी सुरुवात केली आहे. प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरायचं काम हे सरकार करत आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसते. 1500 रुपये देऊन कुणाचं घर चालतं हे सांगावं, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मी काय चूक केली हे मला सांगा. सगळी कामं करून देखील आमचं सरकार पाडलं. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं वाकडं करू देत नव्हतो म्ह्णून त्यांनी सरकार पाडलं. महाराष्ट्र लुटून त्यांना गुजरातला न्यायचं होतं म्हणून त्यांनी सरकार पाडले, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. माझी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना विनंती आहे की, पुढील 15 दिवस त्यांनी देशभरातली नेत्यांना घेऊन महाराष्ट्रात राहावे. पराभव झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निघून जावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला