कोल्हापूरात तणाव, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी

0
296

कोल्हापूर, दि. ७ (पीसीबी) – औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन पुकारले. सकाळी 11 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत स्वतः रस्त्यावर उतरून जमावास आवरण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

आज (बुधवार) हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज कोल्हापूर कडकडीत बंद आहे. हा बंद मागे घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने हिंदुत्ववादी संघटनांना केले आहे. परंतु हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहेत. आज सकाळपासून शहरातील व्हिनस कॉर्नर परिसरासह अन्य ठिकाणी शुकशुकाट आहे. बस, रिक्षा सुरु आहेत.

जिल्हाबंदीचा आदेश लागू करताना प्रशासनाने म्हटले आहे की, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे हद्दीतील काही तरुणांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे काही आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडण्याचे नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर कोल्हापूर शहर कडकडीत बंद आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणांना अटक करण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटना शिवाजी चौक परिसरात जमले आहेत. शहरात सर्वत्र प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व भागातील दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या, रिक्षा, बस, वाहतूक बंद आहे. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे शिवाजी चौक महापालिका परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुकाक काढणे व सभा घेणे यावर बंदी. मात्र, सण-उत्सव-जंयती तसेच लग्न, धार्मिक समारंभ, यात्रा यांना हे निर्बंध असणार नाही.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुन्या, काटया किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, यावर बंदी.

कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेत्रणात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे, या सर्वांवर बंदी