कोल्हापूरकरांना अजित गव्हाणे यांचे नेतृत्व मान्य”-कोल्हापूरवासियांच्या भावना; गव्हाणेंशी वीस वर्षांचा स्नेह

0
2

-उच्चशिक्षित उमेदवाराकडून मतदार संघाच्या विकासाचा विश्वास

भोसरी,दि. १८ (पीसीबी)
अजित गव्हाणे यांच्याशी गेल्या वीस वर्षापासूनचा स्नेह आहे.अत्यंत संयमी, मितभाषी आणि उच्चशिक्षित हे व्यक्तिमत्व असून स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहताना त्यांनी शहराला विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम केले. त्यांच्या कारकिर्दीला कुठेही गालबोट लागलेले नाही. अजित गव्हाणे हे अत्यंत सरळ मार्गी व्यक्तिमत्व असून अशा शांत, संयमी आणि उच्च शिक्षित नेतृत्वाची या मतदार संघाला गरज असल्याच्या भावना कोल्हापूरवासियांनी व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रविवारी संवाद मेळाव्याचे आयोजन सीझन बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे , मेळाव्याचे संयोजक संजय चौगुले, सुनील शिंदे, मैथिली कमळकर, सुनील पाटील, वैभव चौगुले, सचिन पाटील, शंकर पाटील आदी उपस्थित होते.

मेळाव्यामध्ये माजी आमदार विलास लांडे म्हणाले भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या दहा वर्षातील स्थिती पाहिल्यानंतर प्रत्येकाने या मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडवण्याचे ठरवले आहे.नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीमध्ये आहे. प्रत्येक घटकाला या दहा वर्षांमध्ये गैरसोय सहन करावी लागले आहे. जे जे काही सांगितले जात आहे ते सर्व काही कागदावर आहे. नवीन उद्योग धंदे येथे यायला तयार नाहीत. तळवडे ,मोशी ,चिखली या भागातील लघुउद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खंडित वीज पुरवठ्याचा मोठा प्रश्न या मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांना पाण्याचे नियोजन करता आले नाही .

या संवाद मेळाव्यात कोल्हापूरच्या रहिवासियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूरमधून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व्यवसाय, रोजगार यांच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. 20 ते 25 वर्षांपासून भोसरी परिसरात आमचे वास्तव्य आहे. आम्हाला या भागामध्ये शांतता, चांगल्या शैक्षणिक सुविधा, रस्ते ,पाण्याची उपलब्धता, विजेचा अखंड पुरवठा अशा मूलभूत सुविधांची गरज आहे. गेल्या 20 वर्षांपासून आमचा अजित गव्हाणे यांच्याशी स्नेह आहे. त्यांच्या कामाची दूरदृष्टी त्यांनी यापूर्वी दाखवून दिली आहे. महाविकास आघाडी कडून त्यांना संधी मिळाली आहे. त्यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे. म्हणून अजित गव्हाणे यांना आम्ही पाठिंबा देणार असल्याचा निर्धार केला आहे.

विविध समाज घटकातील नागरिकांमुळे या शहराचे नावलौकिक वाढले आहे. प्रत्येक समाजातील नागरिक या शहराची ओळख आहे. कोल्हापूरकर नागरिकांनी या शहराच्या जडणघडणीत आपले योगदान दिले आहे. त्यांनी पाठिंबा जाहीर केला याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रत्येक मागणीचा आदर करून प्राधान्याने या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे अजित गव्हाणे म्हणाले.