कोल्हापुरात लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधात हिंदू ‘जनआक्रोश मोर्चा’

0
342

कोल्हापूर, दि. १ (पीसीबी) – विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधात आज (दि.1) शहरात हिंदू ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांकडून मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता बिंदू चौकातून होऊन मोर्चा मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौकमार्गे भवानी मंडपात दाखल झाला. येथे मोर्चाचे रूपांतर विराट सभेत झाले.

यावेळी भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, नीळकंठ माने, धनंजय देसाई आणि राजश्री तिवारी आदीसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शहरातील विविध संस्था, तालीम मंडळे, महिला उपस्थित होते.

मोर्चात विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चास होणार्‍या संभाव्य गर्दीमुळे पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता. एका बाजूला मोर्चा आणि दुसर्‍या बाजूला शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंप, शंभर फुटी रस्ता, शहाजी कॉलेज मैदान या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती.