भाऊसाहेब भोईर यांची मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांकडे नाट्य परिषदेच्या वतीनं मागणी
पिंपरी, दि. ९ –
कोल्हापुरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीमध्ये जळून खाक झालं. ही आम्हा नाट्य कला प्रेमींसाठी अंत्यत दुःखद आणि त्यापेक्षा जास्त वेदनादायी बातमी आहे. सरकारने या थिएटरची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने तात्काळ समिती स्थापन करावी, आणि वर्षभरात थिएटर उभारणीचे काम पूर्ण करावं, अशी आमची अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात भोईर यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन पाठवलं आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी रोम देशासह इतर देशातील थिएटर पाहून केवळ आपल्या मातीतल्या कलाकारांना चांगल्या ठिकाणी कला सादर करता यावी, कला रसिकांनाही तितक्याच दर्जेदार पणे ती कला पाहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी आजपासून तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी हे थिएटर उभारलं. अनेक मातब्बर कलाकारांनी इथं आपल्या कला सादर केल्या. हे नुसतं थिएटर नव्हतं तर परंपरेचा, इतिहासाचा समृद्ध वारसा होता.
संगीतसूर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या दिवशीच हा ठेवा गमवावा लागला हे दुःख कस व्यक्त करावं, असा आम्हा रंगकर्मीना प्रश्न पडला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला हा समृद्ध वारसा जतन करणे हे शासनाने कर्तव्य आहे.
त्यामुळे शासनाने तात्काळ या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी समिती स्थापन करुन वर्षभरात हे थिएटर पुन्हा सुरु करावे, असे निवेदनात म्हटले आहे