कोलंबिया, ऑक्सफर्ड मध्ये शिकलेला अनिश गावंडे राष्ट्रवादीचा प्रवक्ता

0
143

मुंबई, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं २७ वर्षीय अनिश गावंडेंची राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या पक्षात प्रवेश केल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना गावंडेंनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून राज्यात सर्वोत्तम स्ट्राईक राखणारा शरद पवार गट आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे.वयाच्या केवळ २७ व्या वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते झालेले अनिश गावंडे पिंक लिस्ट इंडिया संघटनेचे संस्थापक आहेत. ही संघटना LGBTQ+ समुदायाच्या अधिकारांसाठी काम करते. ‘निवडणुकीत दमदार यश मिळवणाऱ्या आणि दोन तुकडे होऊनदेखील जबरदस्त पुनरामगन करणाऱ्या पक्षाचा भाग झाल्याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया गावंडे यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना दिली.

मला मिळालेली संधी खूप मोठी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय परिस्थितीत महत्त्वाचे बदल झालेले आहेत. या निवडणुकीनं विरोधी पक्षाला नवी ओळख दिलेली आहे. गेल्या १० वर्षांत केंद्रातील सत्ताधाऱ्यांना सगळ्याच आघाड्यांवर गोंधळ घातला. त्याला केवळ सत्ता पातळीवरच नव्हे, तर वैचारिक पातळीवरदेखील पर्याय देण्याची संधी आता मिळाली आहे. या नव्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला (शप) बरंच काही करुन दाखवायची संधी आहे. या पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे ही निश्चितच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं गावंडे म्हणाले.

अनिश गावंडेंनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून तुलनात्मक साहित्यात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळवली. जगप्रसिद्ध विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या अनिश गावंडेंना राजकारण कायमच खुणावत आलं आहे. ‘मला आधीपासूनच राजकारणात यायचं होतं. पण माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण राष्ट्रवादी शरद पवार गटानं माझ्यासारख्या तरुणावर विश्वास दाखवला. गे असलेल्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या पक्षात महत्त्वाचं पद मिळेल, असा विचारदेखील मी कधी केलेला नव्हता,’ अशा भावना गावंडेंनी व्यक्त केल्या. प्रचारात नवे प्रयोग करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. अमेरिका आणि ब्रिटनमधील अनुभवाचा वापर महाराष्ट्रात करुन राजकारणाला नवा आकार देण्याचा प्रयत्न करु, असं गावंडे म्हणाले