पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) – कोरोनाच्या बीएफ 7 या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. संशयित रुग्णांच्या घशातील व नाकातील द्रवांचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. रुग्णालयांसह मनुष्यबळ, ऑक्सिजन, प्रयोगशाळा, औषधे अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
गेल्या वर्षभरापासून शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. रुग्णांची संख्याही कमी आहे. त्यात लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आली होती. कोरोना गेल्यासारखी परस्थिती निर्माण झाली होती. मात्र, चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. त्याच व्हेरियंटचे रुग्ण देशात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. चीनमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताच कोरोना प्रतंबिधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होवू लागली. मास्क खरेदीही वाढली आहे. नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.
महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोविड तपासणी केली जाणार आहे. दैनंदिन तपासणीसह संशयितांचे नाक व घशातील नमुने तपासणी प्रमाण वाढविले जाईल. जिजामाता, नवीन थेरगाव, नवीन भोसरी व आकुर्डी रुग्णालये उपचारासाठी सज्ज ठेवले आहे. वायसीएमसह अन्य चारही रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा कार्यान्वित आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, दोन प्रयोगशाळा, पुरेसे मनुष्यबळ व औषधसाठा उपलब्ध आहे. बाधित रुग्णांवर लक्ष ठेवून प्रसंगी क्वारंटाइन ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड, मनुष्यबळ व ऑक्सिजन सुविधा व औषध पुरवठा पुरेसा उपलब्ध आहे. रुग्णांच्या घसा व नाकातील द्रवांच्या तपासणीसाठी दोन प्रयोगशाळा सज्ज आहेत. तपासणीचे प्रमाण वाढवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. गर्दीत विनामास्क जावू नये”.