कोयत्याने वार करत तरुणाचा निर्घृणपणे खून सहा जणांवर गुन्हा दाखल

0
1171

महाळुंगे, दि. २८ (पीसीबी) : पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृणपणे खून केला. तसेच त्या तरुणाच्या मित्रावर देखील कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 26) द्पारी साडेबारा वाजताच्या सुमारास महाळुंगे येथे प्रतिक गॅस रिपेअरिंग दुकानात घडली.

त्यानुसार शंभू भोसले, अभी जावळे, वैभव आंधळे, विनोद बटलवार, शेखर नाटक, छोटा साकेत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रितेश संजय पवार (वय 31, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदेश बापूराव भोसले (वय 21, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. जत, जि. सांगली) असे खून हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदेश भोसले यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश भोसले, रितेश पवार आणि त्यांचा मित्र हे त्यांच्या प्रतिक गॅस रिपेअरिंग दुकानात बसले होते. रितेश आणि शंभू भोसले या दोघांमध्ये रविवारी सकाळी गाडीला कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि बाचाबाची झाली होती. त्याचा राग शंभू भोसले याच्या डोक्यात होता. रविवारी दुपारी शंभू त्याच्या साथीदारांना घेऊन प्रतिक गॅस रिपेअरिंग दुकानात आला. रितेश पवार यांच्या चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करून, लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना ठार मारले.

त्यानंतर वैभव आंधळे याने संदेश भोसले यांच्या पाठीत कोयत्याने वार केले. विनोत बटलवार आणि शेखर नाटक यांनी संदेश यांना लाकडी दांडक्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात संदेश भोसले देखील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.