अहमदनगर, दि. २० (पीसीबी) : वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे. लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून तहसीलदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगावचे तहसीलदार विजय जबाजी बोरूडे (रा. शासकीय निवासस्थान कोपरगाव, जि. अहमदनगर) आणि खाजगी व्यक्ती गुरमीत सिंग दडियल ( रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरमीत दडियल याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे . याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता गुरमीत सिंग दडियल याने कोपरगावचे तहसीलदार विजय जबाजी बोरूडे यांच्याकरिता 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तसेच लाच घेण्याचे मान्य केले होते.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अॅन्टी करप्शनच्या पथकाकडे दि. 17 मे 2023 रोजी तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 19 मे 2023 रोजी अॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला असता सरकारी पंचासमक्ष गुरमीत सिंग दडियल याने 20 हजार रूपये लाच म्हणून घेतले. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, तहसीलदार बोरूडे आणि गुरमीत दडियल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे , पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक वैशाली पाटील, पोलिस हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, पोलिस नाईक प्रवीण महाजन,
पोलिस नाईक प्रभाकर गवळी आणि चालक पोलिस संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.