कोण म्हणते बजेटमध्ये महाराष्ट्राला काही नाही… फडणवीसांनी आठ हजार कोटींंच्या कामांची यादीच वाचली

0
109

दि. २३ जुलै (पीसीबी) नागपूर, : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात एनडीएला सरकार स्थापन करण्यासाठी पाठबळ देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर मेहरबानी दाखवण्यात आली आहे. मात्र विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर असताना महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नसल्याची टीका होत आहे.

येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदी सरकार अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले याची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी वाचली.

विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुळा मुठा नदी संवर्धन यासारख्या विविध उपक्रम आणि विकास योजनांसाठी काहीशे कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणलेल्या तरतुदी

  • विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
  • महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
  • पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
  • महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
  • MUTP-3 : 908 कोटी
  • मुंबई मेट्रो: 1087 कोटी
  • दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
  • MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
  • नागपूर मेट्रो: 683 कोटी
  • नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
  • पुणे मेट्रो: 814 कोटी
  • मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी