“कोणाच्या लग्नात गेलं तरी लोकं ‘खोकेवाला आला’ बोलतात”

0
360

नागपूर,दि.२७(पीसीबी) – अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले आमदार बच्चू कडू चांगलेच दुखावले गेले आहेत. रवी राणा यांचे आरोप हे शिंदे गटातील सर्व आमदारांबाबत शंका उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. या सगळ्यामुळे माझ्या मनाला अत्यंत वेदना होतात. जिथे जाऊ तिथे खोक्यांवरून ऐकावे लागते. एवढ्यावेळा खोक्यांचा आरोप झाला आहे की, एखाद्याच्या लग्नात गेलो तरी लोकं ‘खोकेवाला आला’ बोलतात, अशी खंत बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. ते बुधवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. २० वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरीदेखील इतक्या खालच्या पातळीवर आम्हाला टीका सहन करावी लागते. रवी राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाहीत. त्यांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही तर शिंदे गटातील ५० आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुवाहाटीला नेलेले आमदार हे तुम्ही पैशांच्या जोरावर नेले याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी एका बैठकीबाबत गौप्यस्फोट केला. या बैठकीत बच्चू कडूला थंड करायचे ठरवले गेले. तो व्हिडिओ लवकरच माझ्याकडे येणार आहे. केंद्राची मदत घेऊन बच्चू कडूला अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझ्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रवी राणा यांनी १ तारखेपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. अन्यथा आम्ही १ तारखेला वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.

शिंदे गट-भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पेटणार?
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये ओढले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले होते. यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.