दि.१३(पीसीबी) – बोगस उपसूचनांद्वारे ठेकेदारांची ५२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याच्या कोणत्याही उपसूचेवर मी स्वाक्षरी केली नाही. याबाबतची मला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी घेतली आहे.
बोगस उपसूचेवर स्वाक्षरी केल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळून आला आहे. त्यापार्श्वभूमीवर नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, महापालिका सभागृहातील तरतूद-वाढ घट करण्याच्या कोणत्याही उपसूचेनवर मी स्वाक्षरी केली नाही. या बोगस उपसूचनांशी माझा कोणताही संबंध नाही. विनाकारण माझे नाव त्यात ओढू नये. बोगस उपसूचनांवर माझी स्वाक्षरी असल्याचे काही माध्यमांमध्ये छापून येणारे अतिशय दिशाभूल करणारे आहे. यातून माझी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे याप्रकरणाची महापालिका प्रशासनाने सखोल चौकशी करावी. चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका नगरसेवक कुटे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.











































