कोणता झेंडा घेऊ हाती, भाजपचे माजी नगरसवेक तुषार कामठे यांची नागरिकांकडे विचारणा

0
432


पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – राज्यातील राजकीय घडामोडीत पिंपरी चिंचवड शहरातही माजी नगरसेवकांमध्ये मोठी चलबीचल सुरू आहे. गेल्यावर्षी शिवसेना, तर यावर्षी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसही फुटली. त्यातून राज्यात नवी राजकीय समीकरणे आकारास आली. मात्र, त्यामुळे जनताच नाही, तर पहिली टर्म पूर्ण केलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही नवखे तरुण नगरसेवकही गोंधळून गेले आहेत. यामध्ये भाजपानेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले तुषार कामठे आणि राष्ट्रवादीत असलेल्या सुलक्षणा शिलवंत-धीर यांची कोंडी झाली आहे.दोन्ही तरुण माजी नगरसेवकांनी आपल्या वॉर्डातील नागरिकांशी संवाद साधला आहे. भविष्यात कोणता झेंडा हाती घ्यायचा याचा निर्णय आता ते आपल्या मतदारांना विचारून घेणार आहेत. तशी सुरवातही त्यांनी केली आहे. कामठे यांनी जाहीर पत्रक काढून, मी काय करू याबाबत तुम्हीच सांगा, अशा आशयाचे नागरिकांनाच आवाहन केले आहे.

बदलत्या राजकीय समीकरणामुळे दोन्ही लोकप्रतिनिधी गोंधळून गेले आहेत. जनतेच्या अपेक्षा आता पूर्ण कशा करणार ही भीतीही त्यांना सतावते आहे. महापालिका निवडणूक कधी होईल, हे निश्चीत नाही. तरीही ते जनतेचा कौल त्यासाठी जाणून घेत आहेत. मागील २०१९ च्या पिंपरी राखीव विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रथम उमेदवारी जाहीर होऊन नंतर ती रद्द झालेल्या पक्षाच्या तरुण माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धीर या सुद्धा जनतेचे मत विचारात घेऊन आपली पुढील राजकीय वाटचाल करणार आहेत. आगामी निवडणूक लढणार आहे, हे त्यांनी प्रथम स्पष्ट केले. मात्र, जनता ही सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे संतप्त झाली असून त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे, हे जाणून घेणार आहे.

श्रीमती शिलवंंत यांचे दिवंगत पिताश्री अशोक शिलवंत हे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित होते. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील आणि अशोक शिलवंत यांचे गावाकडे ऋणानुबंध कायम होते. त्याच आधारावर श्रीमती सुलक्षणा धर-शिलवंत यांना उमेदवारी मिळाली होती पण आयत्यावेळी ती बदलण्यात आली आणि अजित पवार यांचे समर्थक अण्णा बनसोडे यांना देण्यात आली होती. आता त्या कारणामुळे श्रीमती शिलवंत या अजितदादांकडे जाणार नाहीत, आणि खासदार पाटील यांचे या कुटुंबाशी घरोब्याचे संबंध असल्याने शरद पवार यांच्या गटात राहणे पसंत करतील अशी चर्चा आहे.

गतवेळी २०१७ ला भाजपाकडून प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले दुसरे तरुण नगरसेवक तुषार कामठे यांनी, तर शिलवंत यांच्यापेक्षा आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या मतदारांना काल एक सविस्तर मेसेजच टाकला. त्यातून ते त्यांचा कौल जाणून घेणार आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारे आणि त्यासाठी आपल्या बड्या स्थानिक नेत्यांना म्हणजे आमदारांनाही त्यांनी शिंगावर घेतले होते. त्याचा फटका त्यांना बसला.कार्यक्षम असूनही पाच वर्षात त्यांना पदाधिकारी म्हणून पालिकेत संधीच देण्यात आली नाही. अखेरीस पक्षातील स्थानिक मनमानीला कंटाळून टर्म संपता संपता त्यांनी भाजपाला (BJP) रामराम ठोकला. राष्ट्रवादीत प्रवेश केला. माझ्या मनोगताच्या मेसेजवर लोकांची मते, प्रतिक्रिया काय येतात हे येत्या काही दिवसांत समजणार असून त्यानुसार पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’ला आज सांगितले. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.