कोट्यावधींच्या अपहार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

0
275

कर्मचारी संमतीशिवाय मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेत 76 कोटी 45 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 डिसेंबर 2013 ते 1 जून 2023 या कालावधीत चिखली गाव येथे घडला.

शांतीलाल जी मोहनलाल कवर (वय 65, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईश्वर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व ट्रेड सेंटर अँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तसेच ईश्वर चंदुलाल परमार, आनंद नवरत्न जैन, नरेन किसन मकवाना आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे फर्म पार्टनर यांच्या मालकीची चिखली गाव येथे 14 हेक्टर 40 आर जमीन आहे. आरोपींनी आपसात संगणमत करून रिलायन्स होम फायनान्स आणि एल अँड टी हाऊसिंग फायनान्स या कंपन्यांकडून विजयालक्ष्मी उर्फ विजयालक्ष्मी डेव्हलपर्स या फॉर्मच्या संमतीशिवाय कर्ज घेतले. फिर्यादी यांची मालमत्ता गहाण ठेवून संयुक्त विकसन करारनाम्याचा व कुलमुखत्यार पत्राचा भंग केला. नमूद मर्यादेपेक्षा जास्त रकमेचे कर्ज घेऊन सर्वसाधारण अधिकार पत्रान्वये दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला. स्वतःच्या फायद्यासाठी एल अँड टी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जा पैकी 31 कोटी तीन लाख रुपये हे रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे कर्ज टेक ओव्हर करण्यासाठी वापर केला. तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्ज रकमेपैकी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय 45 कोटी 42 लाख रुपये एल अँड टी हाऊसिंग फायनान्सचे घेतलेले कर्ज भरण्यासाठी वापरले. असा एकूण 76 कोटी 45 लाख रुपयांचा अपहार करून विजयालक्ष्मी उर्फ विजयालक्ष्मी डेव्हलपर्स या फिर्यादी यांच्या फॉर्मची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.