कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

0
145

कोटा, दि. १६ (पीसीबी) – डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी हजारो विद्यार्थी राजस्थानच्या कोटा या शहरात जाताता. खासगी शिकवण्यांच्या मदतीने तेथे जाऊन अभ्यास करतात. मात्र याच कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे

वर्षभरापासून कोटा शहरात अभ्यास
कोटा येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक उमा शर्मा यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. या माहितीनुसार सदर घटना शनिवारी (१० फेब्रुवारी) घडली. पीडित मुलगी ही हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षभरापासून ती कोटा शहरात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करत होती.

आरोपीशी समाजमाध्यमांवर ओळख
“या प्रकरणातील एक आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेशाचा आहे. या आरोपीची आणि पीडित मुलीची समाजमाध्यमावर ओळख झाली. त्यानंतर शनिवारी आरोपीने मुलीला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या आणखी तीन मित्रांनाही बोलावले. त्यानंतर चौघांनी मिळून पीडितेवर अत्याचार केला,” असे शर्मा यांनी सांगितले.

चारही आरोपींना अटक
सुरुवातीला पीडित मुलगी तक्रार देण्यासाठी घाबरत होती. मात्र हा प्रकार तिने मैत्रिणींना सांगितल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढे येत या मुलीने पोलिसांत धाव घेतली. मंगळवारी (१३ फेब्रुवारी) पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणातील आरोपींचे वय १८ ते २० वर्षे आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारीच सर्व आरोपींना अटक केली.

वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल
पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार), ३७६ (बलात्कार) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचे समूपदेशन करण्यात येत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

कोटा शहर म्हणजे डॉक्टर घडवणारी फॅक्टरी
दरम्यान राजस्थानमधील कोटा शहराला डॉक्टर घडवणारी फॅक्टरी असे म्हटले जाते. येथे मोठ्या प्रमाणात खासगी शिकवण्या आहेत. शिकवण्या हा इथला व्यवसाय म्हणून नावारुपाला आला आहे. शिकवण्यांच्या माध्यमातून येथे दरवर्षी जवळपास १० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.