कोटक महिंद्रा बँकेला १.०५ कोटींचा दंड, बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका

0
170

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोटक महिन्द्रा बँक लिमिटेड ला १.०५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडसइंड बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करण्यात विलंब केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.आरबीआयने २९ जून २०२२ च्या आदेशानुसार दोन्ही बँकांवर कारवाई केली. बँकिंग नियमांचं उल्लंघन आणि ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचं पालन न केल्यानं कोटक महिंद्रा बँकेला १.०५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.आरबीआयनं कोटक महिंद्रा बँक लिमिटेडवर बँकिंग विनियमन अधिनियम, १९४९ चे कलम 26A चं उपकलम (2) च्या उल्लंघन प्रकरणी कारवाई केली आहे. दंड द डिपॉजिटर एज्युकेशनअँड अवेअरनेस फंड स्कीमच्या नियमाचं पालन करतना गांभीर्य न बाळगल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार इंडसइंड बँकेवर देखील त्या कोटक महिंद्रा बँकेप्रमाणं नियमांचं पालन करताना गांभीर्य न दाखवल्यानं कारवाई करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेनं देखील आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या केवायसी नियमांची पूर्तता न केल्यानं त्यांच्यावर १ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

नवजीवन को ऑपरेटिव्ह बँक, बालांगीर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धाकुरिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कोलकाता आणि दपलानी को ऑपरेटिव्ह अर्बन बँख लिमिटेड या बँकांवर देखील दंड आकारण्यात आला आहे. या बँकांना १ लाख ते २ लाख रुपयांपर्यतचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयकडून वेळोवेळी नियमांचं पालन करण्यात दिरंगाई करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येत असते. यावेळी खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. बँकांनी ज्या प्रमाणात नियमांचं पालन करण्यात दिरंगाई केली त्याप्रमाणात दंड आकारला जातो.