कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे जुंपली

0
138

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता मनसेने या मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

दरम्यान, उमेदवारी जाहीर होताच अभिजीत पानसे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. पानसे म्हणाले, “राज ठाकरे यांनी माझी योग्यता समजून मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुकीसाठी काम करत आहोत. यासाठी आम्ही कोकणातील पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमच्याकडे ही नोंदणी प्रक्रिया चालू आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की पदवीधर मतदारसंघातून येणारा जो आमदार (विधान परिषदेचा सदस्य) असतो, त्याने पदवीधरांसाठी काहीतरी कामं केली पाहिजेत, अशी सर्व पदवीधरांची अपेक्षा असते. मला काही कोणाचा इतिहास काढायचा नाही. मात्र जे लोक कोकण पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले, सलग १२ वर्षे इथले आमदार राहिले त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून इथल्या पदवीधरांसाठी काय कामं केली आहेत?”

अभिजीत पानसे म्हणाले, “मी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी संबंधित काम करत आहे. मी यापूर्वी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. यामुळे महाराष्ट्रातलं प्रस्थापित शिक्षण क्षेत्र कसं चालतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि ते कसं असायला हवं याबाबत मी माझं नियोजन केलं आहे. आदर्श रचनावादी शिक्षण कसं असायला हवं, बुद्धीमत्तेचा विकास आणि त्यावर आधारित शिक्षण तथा कौशल्य विकास करून रोजगार कसे मिळतील या विषयात मी आणि माझ्या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून काम केलं आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार याचं नियोजन मी केलं आहे. त्यामुळे आम्ही कोकण पदवीधर विधानसभा मतदारसंघात विजयाची गुढी उभारणार आहोत.”

मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, मनसेने आता भाजपाच्याच मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे त्यांच्यातली युती फिस्कटल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अभिजीत पानसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पानसे म्हणाले, “राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, ‘नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांता पंतप्रधान होण्यासाठी आम्ही महायुतीला विनाशर्त पाठिबा देत आहोत.’ देशाला सक्षम पंतप्रधान मिळावा यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता. तसेच त्यावेळी राज ठाकरे यांनी असंही सांगितलं होतं की, येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून लढणार आहोत. कारण आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही आहोत. आम्ही त्यांना केवळ लोकसभा निवडणुकीत विनाशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी आमचे महाराष्ट्र सैनिक लाखोंच्या संख्येने मैदानात उतरले होते. परंतु, आम्ही महायुतीचे घटक नाही. लोकसभा निवडणूक पार पडत नाही तोच विधान परिषद आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे लोकांना असा प्रश्न पडला असेल. ही निवडणूक काही दिवसांनी जाहीर झाली असती तर कदाचित कोणाला असा प्रश्न पडला नसता.”