कोंडी टाळण्यासाठी चाकण एमआयडीसी मध्ये एकेरी वाहतूक

0
55

महाळुंगे, दि. 09 (पीसीबी) : तळेगाव-चाकण मार्गावरील एचपी चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौक, महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक आणि एचपी चौक ते इंडोरन्स चौक या तीनही मार्गावर एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने घेतला आहे. गुरुवारपासून (दि. ५) प्रायोगिक तत्त्वावर हे बदल करण्यात आले आहेत.

महाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीतील पोलिस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंडोरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, एचपी चौक या चौकाचे रस्त्यावरून जड-अवजड, हलकी वाहने व कंपनी बसेस मोठ्या संख्येने वर्दळ असते. तसेच दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होते. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त बापू बांगर यांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तळेगाव-चाकण मार्गावरील एचपी चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौक, महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक आणि एचपी चौक ते इंडोरन्स चौक या मार्गावर एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला आहे.

असे आहेत वाहतुकीत केलेले बदल…

महाळुंगे पोलिस ठाणे चौकाकडून एचपी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून एचपी चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. ही वाहतूक महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक मार्गे वळविण्यात आली आहेत.

इंडोरन्स चौकाकडून महाळुंगे पोलिस ठाणे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून पोलिस ठाणे चौक ते इंडोरन्स चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. ही वाहने इंडोरन्स चौक ते एचपी चौक मार्गे वळविण्यात आली आहे.

एचपी चौकाकडून इंडोरन्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून इंडोरन्स चौक ते एचपी चौक असा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. ही वाहने एचपी चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौक मार्गे वळविण्यात आली आहे.

गुरुवारपासून (दि. ५) हे बदल करण्यात आले असून नागरिकांच्या याबाबत काही सूचना असल्यास त्या पोलिस उपआयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी- चिंचवड कार्यालयात १९ डिसेंबरपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.