कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली म्हणून प्राचार्यांना बजरंग दलाकडून मारहाण

0
444

पुणे, दि. ६ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले? आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात? हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांन मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे कपडे फाटल्याचं दिसत आहे. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ही घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल अजून प्रलंबित असताना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेवरून हा वाद झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबद्दल मौन बाळगलं आहे.