कैलास कदम हा सर्व सामान्य कामगारांचा साथी : मोहन जोशी

0
295

– मानव कांबळे यांचा “हिंद रत्न पुरस्कार” देवून गौरव

पिंपरी, दि.५ (पीसीबी) – हिंद कामगार संघटनेचे काम कामगार क्षेत्रात उल्लेखनीय आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी कामगार मित्रांबरोबर नेहमीच “साथी” म्हणून काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत हजारो कारखान्यात लाखो कामगारांना न्याय हक्क मिळवून दिला आहे. यातून त्यांचे नेतृत्व घडले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर इंटक च्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पदांची जबाबदारी आहे. त्यांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्व विचारात घेऊन शहर काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर एक काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. तेच गत वैभव पुन्हा एकदा कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसला मिळेल असा विश्वास माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

हिंद कामगार संघटनेचा १५ वा वर्धापन दिन निमित्त खराळवाडी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात “हिंद रत्न पुरस्कार” ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांना माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, मानव कांबळे, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, निर्मला कदम, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष प्रताप गुरव, बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष लक्ष्मण घुमरे, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे, सचिव दत्तात्रय तिगोटे, संभाजी ब्रिग्रेडचे अभिमन्यु पवार, प्रवीण कदम, प्रदीप पवार, डॉ. मनिषा गरूड, खजिनदार सचिन कदम, गणेश गोरीवले, किरण भुजबळ, विकास साखरे, सोपान बरबदे, सतोष खेडेकर, विठ्ठल गुंडाळ, नवनाथ जगताप, संतोष पवार, अमोल पाटील, नवनाथ नाईकनवरे, सुरेश संदुर आणि बहुसंख्य कामगार बंधु भगिनी उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत सुपेकर, स्वागत डॉ. कैलास कदम, आभार शांताराम कदम यांनी मानले.