कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली तरी काँग्रेस खाते उघडेल का ?

0
297

– एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्ष अस्तित्वशून्य झाला आहे. जिथे किमान ६० पर्यंत काँग्रेस नगरसेवकांची ताकद असायची तिथे मोठा शून्य पदरात पडला. शिवसेना, मनसे, रिपाई, आप पेक्षाही सव्वाशे वर्षे जुन्या काँग्रेसची हालात झाली. मागील महापालिका निवडणुकीत तर काँग्रेसमुक्त शहर झाले. महापालिकेत अक्षरशः एकही नगरसेवक निवडून आला नाही. सचिन साठे यांच्या काळातील हे अपयश असल्याने अखेर कामगार नेते कैलास कदम यांच्याकडे शहर काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीत कदम यांच्या नेतृत्वाखाली तरी काँग्रेस खाते उघडेल का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा पाया काँग्रेसने उभारला. त्यावर कळस रचण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. शहराच्या जडणघडणीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. शहरात काँग्रेसची मोठी ताकद होती. तत्कालीन शिक्षणमंत्री दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहर काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. पण, मोरे सर यांच्या निधनानंतर शहर काँग्रेसकडे राज्य नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले. तत्कालीन मंत्री दिवंगत पतंगराव कदम, भाजपवासी झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे शहर काँग्रेसची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण, त्यांनीही म्हणावे तितके शहरात लक्ष घातले नाही. सुरेश कलमाडी यांनी इकडे डोकावण्याचा प्रयत्न केले होता, पण त्यांना शिरकाव करता आला नाही. त्यामुळे शहरात काँग्रेसची दयनिय अवस्था झाली.

शहरात अद्यापही काँग्रेसची विचारसरणी, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. शेकडो जुने जाणते कार्यकर्ते आजही काँग्रेसचाच जप करतात आणि अभिमानाने मिरवतात. पण, पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय, एकमत नसल्याने आता मतदारही दूरावत चालला आहे. परिणामी, पक्षाची ताकद कमी होत आहे. तरी देखील शहरातील नेत्यांमधील मतभेद कमी होत नाहीत. सचिन साठे यांनी सुमारे सहा वर्ष शहर काँग्रेसचे नेतृत्व केले. पडत्या काळात त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली होती. त्यांनी विविध आंदोलने करुन शहरात पक्ष जिवंत ठेवला. परंतु, त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला. काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना विधानपरिषदेची आमदारकी न मिळाल्याने नाराज झालेल्या साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

11 नोव्हेंबर 2020 रोजी साठे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 11 महिन्यांनी म्हणजेच 7 ऑक्टोबर 2021 रोजी कदम यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी महापालिका निवडणूक कदम यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल. कदम यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य या महत्वाच्या पदावर काम केले. ते इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनी कामगार क्षेत्रात अतिशय भरीव काम केले आहे. त्याच बरोबरीने त्यांनी कोकणातील असंख्य बांधवांना एकत्र करून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोकण विकास महासंघाची स्थापना केली. त्यामुळे कदम यांच्या नेतृत्वाखाली तरी महापालिका सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कैलास कदम हे सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवत होते. आंदोलन करत होते. शहराध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीला आक्रमक झालेले कदम हेही नंतर थंड झाले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून तर कदम पूर्णपणे शांत झाले आहेत. पक्षाचे आंदोलन होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिशा मिळत नाही. कार्यकर्ते भरकटले आहेत. काँग्रेस पक्ष आणि शहरातील त्यांचे नेते असेच थंड राहिले तर आगामी निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून येईल की नाही सांगणे कठिण आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारामुळे लोकांनी भाजपला संधी दिली. गेल्या पाच वर्षांत भाजपने राष्ट्रवादीपेक्षा दहा पट भ्रष्टाचार केला आणि शहर लूटले. अशा परिस्थितीत लोक पर्याय शोधत आहेत, पण सक्षम नेता, नगरसेवक मिळत नाही ही खंत आहे. काँग्रेसला ही पोकळी भरून काढता आली असती, पण संघटन झिरो आहे. कदम हे इंटक च्या राष्ट्रीय कार्यकारणीत असल्याने त्यांचेही म्हणावे असे लक्ष नाही. शहरात काँग्रेसचे ना कुठले शिबिर होते, ना कुठला मेळावा. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर काँग्रेसमध्ये मरगळ आहे. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराबद्दल राष्ट्रवादी आणि सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच मनसे तुटून पडते, मात्र काँग्रेस तिकडे कानाडोळा करते. भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे असताना तिथे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने आता लोकनाही काँग्रेसकडून अपेक्षा राहिलेली नाही. महापालिका निवडणुकित महाआघाडी झालीच तर काँग्रेसला १२८ पैकी १०-१५ जागांवरसुध्दा उमेदवार उभे करता येणार नाहीत, इतकी दयनिय अवस्था आहे. कदम यांची एकला चलो रे अशी भूमिका असल्याने ध्वजवंदनालासुध्दा १०-१५ कार्यकर्त्यांची उपस्थिती नसते. अशा स्थितीत काँग्रेस किती जागा लढवणार आणि किती जिंकणार याबाबत साशंकता आहे.