केसगळती प्रकरणाती केंद्राकडून दखल

0
3

वडनेर, दि. १२ : विविध आरोग्य यंत्रणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील तज्ज्ञांच्या भेटी, सर्वेक्षणाचा धडाका आणि शनिवारपासून (११ जानेवारी) चालू झालेलं नेत्यांच्या सांत्वनपर भेटींचं सत्र, असं सध्या शेगाव तालुक्यातील काही गावांमधील चित्र आहे. ‘भय इथले संपत नाही,’ असे भयावह आणि विदारक चित्र या गावांमध्ये दिसून येत आहे. शेगाव तालुक्यात कमीअधिक पाच दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या आकस्मिक केसगळती आणि टक्कल या अनामिक आजाराचा प्रसार किंबहुना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. यावर कळस म्हणजे या विचित्र तथा भीतीदायक आजाराने शनिवारी शेगाव तालुक्याच्या सीमा ओलांडल्या असून शेजारील नांदुरा तालुक्यात शिरकाव करीत भयाची व्याप्ती वाढवली आहे. नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाडी या गावात केसगळती आणि टक्कलचे सात रुग्ण आढळून आल्याने नांदुरा तालुका आणि आरोग्य यंत्रणा हादरल्या आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

“केस गळती कशामुळे होतेय? हे शोधण्यासाठी सोमवारी दिल्ली, चेन्नई येथून तज्ज्ञ डॉक्टरांची पथकं बोलावण्यात आली आहेत. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर्स व आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती आजारावर संशोधन करीत आहेत. नागरीकांनी घाबरू नये”, असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.

प्रतापराव जाधव यांनी केस गळतीबाधित गावांना भेटी दिल्या
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये नागरिकांचे केस गळून टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. ११ जानेवारी रोजी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळतीबाधित गावांना भेटी दिल्या. रुग्णांबरोबर संवाद साधला आणि या आजाराविषयी जाणून घेतले . हा आजार पहिल्यांदाच उद्भवला असल्याने आजाराच्या मुळाशी जाऊन संशोधन करणे गरजे आहे, या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाययोजना चालू आहेत . घरघुती वापरातील तेल, साबण, शाम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही या उत्पादनांची मुदतबाह्य झाली आहे का याचीही तपासणी करून त्यानंतरच ते वापरण्याचे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले.

“केस गळतीच्या घटनांची वेळीच दखल घेऊन मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी आलो आहे, केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य विभाग २४ तास तुमच्या सेवेत राहणार आहेत”, असेही मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते.