केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पाच प्रश्न …

0
103

नवी दिल्ली, दि. 25 (पीसीबी) : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. तुम्ही जो नियम लावून लालकृष्ण अडवाणी यांना निवृत्त व्हायला सांगितले, तोच न्याय नरेंद्र मोदी यांना लावणार का, असा प्रश्न केजरीवाल यांनी या पत्रातून उपस्थित केला. अरविंद केजरीवाल यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये एका नेत्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. काही दिवसांनी त्याच नेत्याशी हातमिळवणी करुन भाजपने सरकार स्थापन केले. हे सर्व पाहून तुम्हाला वाईट वाटत नाही का, असा सवालही केजरीवाल यांनी विचारला आहे.

पत्रात केजरीवाल म्हणतात…
मी आशा करतो की तुम्ही व्यवस्थित असाल. मी हे पत्र एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर देशातील एक सामान्य नागरिक म्हणून लिहीत आहे. देशातील सध्याची परिस्थितीत पाहून मी चिंतेत आहे. केंद्र सरकार आणि भाजप संपूर्ण देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे, ते देशासाठी हानिकारक आहे. हे सगळं असंच सुरु राहिलं तर देशातील लोकशाही आणि पर्यायाने देश संपुष्टात येईल. राजकीय पक्ष येतील-जातील, निवडणुका येत-जात राहतील. मात्र, भारत हा देश कायम राहील. त्यामुळे देशाचा तिरंगा ध्वजही डौलाने फडकत राहील, याची काळजी आपण घेतली पाहिजे. या पार्श्वभूमीवर आजघडीला देशातील जनतेच्या मनात असलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे. मला केवळ देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि आणखी मजबूत करायची आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

अरविंद केजरीवालांनी पत्रात कोणते 5 प्रश्न विचारले?
* देशभरात आमिष दाखवून किंवा ईडी-सीबीआयचा धाक दाखवून राजकीय पक्ष फोडले जात आहेत, राजकीय पक्षांची सरकारं पाडली जात आहेत. अशाप्रकारे सरकार पाडणे देशाच्या लोकशाहीच्यादृष्टीने योग्य आहे का? कोणत्याही पातळील जाऊन, बेईमानी करुन सत्ता मिळवणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का?

* मोदीजींनी जून 2023 मध्ये एका नेत्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि काही दिवसांनंतर त्या नेत्यासोबत सरकार स्थापन केली. हे सर्व पाहून तुम्हाला दु:ख होत नाही का?

* भाजप या पक्षाचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गर्भातून झाला. त्यामुळे भाजप पक्ष वाट चुकत असेल तर त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीचे पाऊल उचलण्यापासून कधी रोखले का?

* जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीवेळी म्हटले होते की, भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. मुलगा इतका मोठा झाला का, आईच्या नजेरला नजर मिळवू लागला. जे.पी. नड्डांच्या वक्तव्यावर संघाचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर तुमच्या मनात काय भावना होत्या?

* ज्या कायद्यानुसार लालकृष्ण अडवाणी यांना ते 75 वर्षांचे झाल्यावर रिटायर करण्यात आले, तो मोदीजींना लागू होणार नाही का? हा नियम पुढे करुन अडवाणी, शांता कुमार, खंडुरी, सुमिता महाजन आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या अनेक बड्या नेत्यांना भाजपने घरी बसवले. तो नियम आता मोदीजींना लागू होणार नाही का