केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे

0
511

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि बारा खासदारांच्या बंडांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना रोज धक्के बसत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अनेक निर्णय स्थगित केले जात आहेत. आता मोदी सरकारच्याही रडारवर ठाकरे आले आहेत.

आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असतानाच्या अडीच वर्षांच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांचे आणि कामांचे मोदी सरकारकडून ऑडिट सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे. ठाकरे यांनी केलेल्या कामाचे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीकडून सातत्याने कौतुक केले जात होते. जागतिक पातळीवर आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता. पण आता याच कामांकडे मोदी सरकारची नजर वळली आहे.

मोदी सरकारकडून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळातील मागील अडीच वर्षांचा लेखाजोखा तपासला जात आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, ठाणे, औरंगाबाद आणि रायगड या विभागांचे केंद्राकडून ऑडिट सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक विभागाचे टप्प्याटप्प्याने ऑडिट करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्याचे समजते.दरम्यान, शिंदे यांनी रविवारी पुन्हा ठाकरेंच्या नावाचा उल्लेख टाळून टीका केली. ते म्हणाले, मला कुणावरही टीका करायची नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. त्या विचारांना आम्ही पुढे नेत असल्याने जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे आम्हाला मोठं समर्थन मिळत आहे.

आम्ही घेतलेली भूमिका महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल.बाळासाहेब हे आमचे कुटुंबप्रमुख होते. तेही आम्हाला कुटुंबातले मानत होते. बाळासाहेब हे आम्हाला वडिलांसारखे होते. पाठीत खंजीर खुपसले, हे सातत्याने बोलले जात आहे. मी त्यावर एवढंच बोलू शकतो, जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरों में अटके है, उनके मुहसे खंजीर की बात अच्छी नही लगती. खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खुपसला, हे मी योग्यवेळी बोलेन, अशा शब्दांत शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं.

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली, हे सर्वश्रृत आहे. जनमताचा कौल तोडून जे सरकार स्थापन झाले त्यावरच आमदारांचा आक्षेप आहे. म्हणून आम्ही ही भूमिका घेतली आहे. शिवसेना हे कुटुंब बाळासाहेब मानत होते. ते महापुरूष होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झाले आहे. हे अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते. त्याची दुरूस्ती आम्ही आता केली आहे. शिवसेना-भाजप युती निवडणुकीपुर्वी केली होती. अडीच वर्षांपूर्वीच युतीचे सरकार यायला हवे होते, याचा पुनरूच्चार शिंदे यांनी केला.