पुणे, दि. ७ ( पीसीबी ) : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’घेण्यात येणार आहे; मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करावे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रीलबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिग ऑफीसर कर्नल निशाद मंगरुळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, यांच्यासह सर्वसंबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेत आहोत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली जाणार आहेत,त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.
केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत.
यावेळी कर्नल चतुर यांनी ‘मॉक ड्रिल’बाबत मार्गदर्शन केले. युद्धजन्य परिस्थितीत जनजीवन विस्कळीत सुरळीत राहण्याकरीता या मॉक ड्रीलला अनन्यसाधारण महत्व आहे, असेही कर्नल चतुर म्हणाले.