केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते गौरव

0
11

आयपी पुरस्कार मिळवणारी पीसीसीओई राज्यातील एकमेव खासगी संस्था

पुणे दि.३ – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या भव्य सभारंभात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पीसीसीओईच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक यांच्याद्वारे आयोजीत केलेल्या भव्य सभारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार पीसीसीओईचे पेटंट कक्ष अधिकारी डॉ. उज्वल शिरोडे आणि प्रा.अजय एस. गाढे यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आय.पी.) पुरस्कार दरवर्षी आयपी निर्मिती आणि व्यापारीकरणात दिलेल्या सर्वोत्तम योगदानाबद्दल व्यक्ती, संस्था किंवा उद्योगसमूह यांना देण्यात येतो. भारतातील बौद्धिक संपदा (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी) क्षेत्रात नाविन्यपूर्ण, सर्जनशील कामगिरी करून बौद्धिक संपदेच्या वाढीसाठी योगदान देणे हे या पुरस्कारामागील उद्दिष्ट आहे.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने आपल्या पेटंट सुविधा कक्षाच्या (पीएफसी सेल) अंतर्गत एकूण ६५ पेटंट अर्ज यशस्वीरित्या दाखल केले आहेत, त्यापैकी २४ पेटंट मंजूर झाले आहेत. तसेच उर्वरित पेटंट गेल्या ३ वर्षांत यशस्वीरित्या प्रकाशित झाले आहेत. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही महाराष्ट्रातील एकमेव खाजगी संस्था ज्यांना यंदाच्या पुरस्कार्थी यादीत स्थान मिळाले आहे.
प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार मिळाल्याबद्दल पेटंट सुविधा कक्षाचे डॉ. प्रमुख उज्वल शिरोडे आणि प्रा.अजय गाढे तसेच पेटंट दाखल करणाऱ्या प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ.गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ.नीलकंठ चोपडे यांच्यासह पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन केले आहे.