केंद्रीय मंत्री आरके रंजन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

0
299

इंफाळ, दि. १६ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेली हिंसा थांबण्याचं नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये थांबून थांबून हिंसा होत आहे. या हिंसक आंदोलकांनी आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट केलं आहे. हिंसक आंदोलकांनी आरके रंजन सिंह यांच्या घरालाच आग लावली आहे. मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचं घर जाळलं आहे. मात्र, सिंह हे घरी नव्हते, त्यामुळे थोडक्यात बचावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इंफाळमध्ये संचारबंदी लागू असतानाही जमावाने संचारबंदी झुगारून केंद्रीय मंत्र्याच्या घरावर धडक दिली. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असतानाही जमावाने मंत्र्याचं घर पेटवून दिलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाजप हादरून गेला आहे.

मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसेचा आढावा घेतला होता. अधिकारी आणि काही प्रतिष्ठीत लोकांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात हिंसा भडकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यातील हिंसाचार पाहता स्थानिक आमदारांनी आपल्या घराबाहेर एक बॉक्स ठेवला आहे. लुटमार करून आणलेली आणि हिसकावून आणलेली हत्यारे या बॉक्समध्ये टाका, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलं आहे. नागरिकांनी हिंसा करू नये म्हणून आमदारांनी ही शक्कल लढवली आहे.

केरळला होते म्हणून…
केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. आंदोलकांनी थेट मंत्र्यांच्याच घराला लक्ष्य केल्याने राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मंत्री राजकुमार सिंह हे केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले आहेत.