केंद्रीय निवडणूक आयोग आला ताळ्यावर, विरोधकांना चर्चेसाठी केले पाचारण

0
52

नवी दिल्ली, दि. 30 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा फेरफार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जात आहे. ईव्हीएम आणि राज्यात वाढलेल्या मतदानाविरोधात महाविकास आघाडीकडून सातत्याने वक्तव्य केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मविआच्या शंकांचे निरासन केले होते. तसेच सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने भूमिका बदलली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. तुमच्या शंकांचे निरासन करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाविकास आघाडी आणि मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिले आहे.

महाविकास आघाडीतील सर्व पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकी प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. परंतु आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी या विषयावर भूमिका मांडली नव्हती. जोपर्यंत आपल्याकडे ठोस माहिती येत नाही, तोपर्यंत ईव्हीएमवर आपण बोलणार नाही, असे ते म्हणाले होते. परंतु शनिवारी त्यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. आम्हाला काही लोकांनी त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. पण आम्ही विश्वास ठेवला नाही. मात्र, आता ईव्हीएम हॅक होऊ शकते हे आमच्याही लक्षात आले आहे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग तरी चुकीचे वागणार नाही, असे आम्हाला वाटत होते, असे शरद पवार म्हणाले.

शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदान कसे वाढले? हा प्रश्न काँग्रेसकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. त्यावर राज्या निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले होते. परंतु त्यानंतरही राजकीय पक्षांच्या शंका कायम आहे. यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना चर्चेसाठी बोलवले आहे. या चर्चेत आता विरोधक काय भूमिका मांडतात? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.