पिंपरी दि. १ (पीसीबी) – जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरुष गटात अभिजित त्रिपणकर, महिला गटात पुष्कर्णी भट्टड तर ज्येष्ठ नागरिक गटामध्ये फैय्याज शेख यांनी अजिंक्यपद पटकावले. कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष भारत देसरडा आणि माजी नगरसेवक तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथे कै. सौ. मनीषा भोईर विरंगुळा केंद्रामध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 29 ते 31 जुलै दरम्यान पार पडलेली ही स्पर्धा पुरुष, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा तीन गटांत घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 331 खेळाडू सहभागी झाले होते. विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीसे तसेच स्मृतीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरुष गटात अभिजित त्रिपणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुष्कर्णी भट्टड या महिला गटात प्रथम आल्या तर ज्येष्ठ नागरिक गटामध्ये फैय्याज शेख यांनी बाजी मारली. पुरुष गटात द्वितीय क्रमांक योगेश परदेशी, तृतीय- रहिम खान, चतुर्थ- अनिल मुंढे, पाचवा- सागर वाघमारे, सहावा- प्रकाश गायकवाड, सातवा- गणेश तावरे तर आठवा क्रमांक जाफर शेख यांनी मिळवला. महिला गटात द्वितीय क्रमांक मेधा मटकरी, तृतीय- ज्ञानेश्वरी इंगुलकर, चतुर्थ- तुलिका चौरासिया, पाचवा- श्रुती वेळेकर, सहावा- पूजा मेश्राम, सातवा-शुभदा आफळे तर आठवा क्रमांक श्रुती शिंदे यांनी पटकावला. ज्येष्ठ नागरिक गटामध्ये द्वितीय क्रमांक बाळकृष्ण लोहकरे, तृतीय- किशोर गुरुनानी, चतुर्थ- राजू वानखेडे, पाचवा- सुनील वाघ, सहावा- संतोष निमकर, सातवा- राजाभाऊ ठाकूर तर आठवा क्रमांक सोमनाथ मिरजकर यांनी मिळवला.
या स्पर्धेमध्ये ‘ब्रेक टू फिनिश’ चा मान श्रीकांत मदनाल, ज्ञानेश्वरी इंगुलकर यांनी मिळवला तसेच अंतिम फेरीच्या सामन्यात अभिजित त्रिपणकर दोन वेळा ‘ब्रेक टू फिनिश’ करून विजेतेपद मिळवले. ‘ब्लॅक टू फिनिश’ चा मान सुनील कन्ना यांनी मिळवला. या स्पर्धेचे चीफ रेफ्री म्हणून विलास सहस्रबुद्धे आणि संदीप अडागळे यांनी कामकाज पाहिले तर असिस्टंट चीफ रेफ्री म्हणून काम पाहिले. पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त खेळाडू कॅरम या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून शहराचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे भारत देसरडा यांनी व्यक्त केला. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी क्रीडा विभागाचे उपआयुक्त विठ्ठल जोशी, क्रीडाधिकारी अनिता केदारी, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे समितीचे सचिव नंदू सोनावणे, सहसचिव रावसाहेब कानवडे यांच्यासह खेळाडू, महापालिका कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. क्रीडा पर्यवेक्षक जयश्री साळवी, क्रीडा विभागाचे राजेंद्र नागपुरे, शैलेश खेडकर, सुनील रेणुसे, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे समितीचे खजिनदार प्राची जोशी, सहखजिनदार सुदाम दाभाडे, स्पर्धा व्यवस्थापक हर्षवर्धन भोईर, अविनाश कदम, नंदकुमार साने, विनोद देसाई, मुकेश इंगुळकर आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.











































