- सद्गुरूंना हा पुरस्कार मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि कॉन्शस प्लॅनेट मोहिमेद्वारे केल्या गेलेल्या पर्यावरणविषयक प्रयत्नांसाठी दिला गेला आहे. सद्गुरूंना मिळालेले ५०,००० कॅनेडियन डॉलर्सचे बक्षीस त्यांनी कावेरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि ८४ दशलक्ष लोकांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कावेरी कॉलिंग उपक्रमाला समर्पित केली
पुणे, दि. २६ – भारतीय योगी, अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, सद्गुरू यांना कॅनडा इंडिया फाऊंडेशन (सीआयएफ) तर्फे ‘ग्लोबल इंडियन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि कॉन्शस प्लॅनेट मोहिमेद्वारे पर्यावरणविषयक केल्या गेलेल्या प्रयत्नांसाठी दिला गेला आहे. जागतिक पातळीवर महत्वाचा प्रभाव टाकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो.
ऑक्टोबर २०२४ मध्ये जाहीर झालेला हा पुरस्कार २२ मे २०२५ रोजी टोरांटो येथे सीआयएफचे अध्यक्ष रितेश मलिक आणि राष्ट्रीय समन्वयक सुनीता व्यास यांच्या हस्ते भारतीय-कॅनेडियन नेते, उद्योजक आणि समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
पुरस्कारासोबत ५०,००० कॅनेडियन डॉलर्सची रक्कम सद्गुरूंना देण्यात आली, जी त्यांनी कावेरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आणि ८४ दशलक्ष लोकांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कावेरी कॉलिंग उपक्रमाला समर्पित केली.
या प्रसंगी बोलताना सीआयएफचे अध्यक्ष रितेश मलिक म्हणाले, “सद्गुरू आपल्याला मातीची होणारी झीज, हवामान बदल आणि अन्नाची गुणवत्ता यासारख्या जागतिक आव्हानांबाबतीत व्यावहारिक आणि दीर्घकालीन उपाय देत आहेत. सद्गुरूंसारख्या विचारवंतांकडून कॅनडाला मोठा लाभ होऊ शकतो, कॅनडाचे लक्ष वैयक्तिक कल्याण, शाश्वतता आणि समावेशकता यावर केंद्रित आहे, जे सद्गुरूंच्या मार्गदर्शनासोबत सुसंगत आहे. सद्गुरूंचा योग आणि ध्यान यावरचा भर हा कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांशी, विशेषतः मानसिक आजारामुळे व्यवस्थेसमोर निर्माण होणाऱ्या मोठ्या आव्हानाशी संपूर्णपणे जुळणारा आहे.”
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सीआयएफने म्हटले आहे, “भारतीय-कॅनेडियन समुदायाच्या वतीने, सद्गुरूंनी कॅनडा इंडिया फाउंडेशनचा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. सद्गुरूंचा संदेश सखोलपणे प्रतिध्वनित होतो: सुजाण आणि करुणामय मानवता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.”
प्रतिसाद देताना, सद्गुरू म्हणाले, “भारतीय समुदाय कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांच्या विकास आणि समृद्धीमध्ये योगदान देत आहे हे पाहून आनंद होतो. तुमचे प्रेम आणि आतिथ्य याबद्दल मनापासून आभारी आहे. खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद.”
कॅनडा इंडिया फाऊंडेशन हा कॅनडा-भारत संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणारा सार्वजनिक धोरण विचारमंच आहे. त्यांचा ग्लोबल इंडियन अवॉर्ड हा उत्कृष्टता आणि मानवतेची सेवा करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचा गौरव करतो. हा पुरस्कार सद्गुरूंप्रमाणे जागतिक बदल घडवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतो. सद्गुरूंची कॉन्शस प्लॅनेट मोहीम ही सेव्ह सॉईल, कावेरी कॉलिंग, ॲक्शन फॉर रुरल रिज्युवनेशन आणि ईशा विद्या यासारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरणीय आणि सामाजिक परिवर्तन घडवत आहे.












































