कॅनडामध्ये 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

0
25

कॅनडा, दि. 09 (पीसीबी) : कॅनडामध्ये एका 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हर्षदीप सिंग हा विद्यार्थी पंजाबचा होता. तो कॅनडातील एडमंटन शहरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. हर्षदीपचा खून सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एडमंटनमध्ये 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हर्षदीप सिंगला मागून गोळी लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हर्षदीपवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीशिवाय घटनास्थळी एक मुलगा आणि एक महिलाही उपस्थित होते. हर्षदीपने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्याला मागून पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर लगेचच हल्लेखोराने हर्षदीपवर गोळीबार केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडात शिकण्यासोबतच हर्षदीपने आपला खर्च भागवण्यासाठी सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले. हर्षदीपच्या हत्येप्रकरणी इव्हान रेन आणि ज्युडिथ सोल्टो नावाच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांचे वय 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडामध्ये हत्येचे तीन प्रकार हर्षदीपचा खून करणाऱ्या आरोपींवर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप आहे.

कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांची हत्या ही काही नवीन गोष्ट नाही. अलीकडेच पंजाबमधील गुरसिस सिंग या भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कॅनडातील सार्निया शहरातील 36 वर्षीय क्रॉस्ले हंटरला सेकंड डिग्री मर्डरच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

हर्षदीपच्या हत्येमागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. दर आठवड्याला दोन भारतीयांचे मृतदेह पाठवले जात असल्याचे भारतीय राजदूताने सांगितले होते. खलिस्तानी कट्टरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. गेल्या आठवड्यात 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले होते.

कॅनडामध्ये तैनात असलेले भारतीय राजदूत संजय वर्मा परत आले, तेव्हा त्यांनी एका मीडिया मुलाखतीत कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितले. आपल्या मुलांना कॅनडाला पाठवण्यापूर्वी पालकांनी दोनदा विचार करावा, असे ते म्हणाले होते. मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी कॅनडाच्या नागरिकांपेक्षा 4 पट अधिक शुल्क भरत आहेत, परंतु त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुविधा मिळत नाहीत.