कुरियर पार्सलवरुन उलगडला खुनाचा गुन्हा

0
104

गुंडा विरोधी पथकाने दोन आरोपींना वाशिममधून घेतले ताब्यात

पिंपरी, दि. 10 (पीसीबी) : सतत होणार्‍या भांडणामुळे दोन जणांनी मिळून आपल्‍याच मित्राचा खून केला. ही घटना औध रुग्‍णालयाच्‍या आवारात मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासात खुनाचा उलगडा केला.

पप्पु उर्फ जितेंद्र त्रिपाठी (रा. अहोदा, तहसील राजापुर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. शिव मंगल सिंग (वय ३८) आणि सोमदत्त मनमोहन दुबे (वय २२, दोघेही रा. अहोदा, तहसील राजापुर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे औंध रुग्‍णालय परिसरात एकाचा दगडाचा ठेचून खून झाल्‍याचे उघडकीस आले. मयत व्‍यक्‍तीची ओळख पटली नाही.

असे निष्‍पन्‍न झाले आरोपीचे नाव

गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांच्‍या पथकाने आसपासच्‍या परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेज तपासण्‍यास सुरूवात केली. त्‍यावेळी दोनजण इसम मयत व्‍यक्‍तीसोबत दुचाकीवरुन ट्रिपल सीट बसून सांगवी परिसरात दारु घेण्यासाठी आलेले आढळुन आले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाची पार्सलची पिशवी होती. संशयित दुचाकीवरुन कोठे जात आहे हे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता तो कृष्णा चौकातील कुरियरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. कुरिअर कंपनीमध्ये जावून चौकशी केली असता संशयिताचे नाव शिव मंगल सिंग असल्याचे समजले.

येथून मिळाली ट्रॅव्‍हलर्स बसची माहिती

पोलिसांनी त्‍याचा मोबाइल क्रमांक मिळवून त्‍याचे तांत्रिक विश्‍लेषण केले असता त्‍या फोनचे लोकेशन पारनेर येथे असल्याचे समजले. त्‍यानुसार पोलिसांचे एक पथक आरोपीच्‍या मागावर रवाना केले. अर्धा तास एकाच लोकेशन आल्‍याने आरोपी जेवणाकरिता थांबले असल्याचा संशय आला. पोलिसांनी त्‍या भागातील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हे जेवण करण्यासाठी एक तासापूर्वी थांबल्याचे निष्पन्न झाले. त्‍या फुटेजवरून लागलीस सी.सी.टी.व्ही. मार्फत आरोपी प्रवास करीत असलेल्या ट्रॅव्हल बस क्रमांक प्राप्त केला. आरोपींना समृध्दी महामार्गावरील वाशिम जिल्‍ह्यातील शेल टोल प्लाझा येथून ताब्‍यात घेतले.

असे गाठले आरोपींना

तांत्रिक विश्‍लेषण करून ट्राव्‍हलर्स बसच्‍या चालकाच्‍या मोबाइलवर पोलिसांनी संपर्क केला. तुमच्‍या बसमध्‍ये आरोपी असून पोलीस पाठलाग करीत असल्‍याचे सांगितले. त्‍यासाठी बसचा वेग कमी ठेवण्‍याच्‍या सूचना पोलिसांनी दिल्‍या. त्‍यानुसार बस चालकाने बसचा वेग कमी ठेवल्‍याने पोलिसांनी वाशिम येथे आरोपी प्रवास करीत असलेल्‍या बसला गाठले व आरोपींना ताब्‍यात घेतले.


या पथकाने केली कामगिरी

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपाआयुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने उपनिरीक्षक अशोक जगताप, अंमलदार पी.पी.तापकीर, एस.एन.ठोकळ, व्ही.एच.जगदाळे, जी.डी.चव्हाण, एस.डी.चौधरी, ए.पी.गायकवाड, व्ही.टी.गंभीरे, जी.एस.मेदगे (तात्रिक विश्लेषण), के. पी. वाळंजकर (रेखाचित्रकार), एस.पी.बाबा (तात्रिक विश्लेषण), एन.बी.गेंगजे, व्ही.डी.तेलेवार, आर.के.मोहीते, एस.पी.घारे, एस.टी.कदम, टी.ई.शेख, व्ही.एन.वेळापुरे यांच्‍या पथकाने केली आहे.