चिंचवड, दि. २० (पीसीबी) – कुरियर कंपनीत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनी डिलिव्हरी बॉय सोबत मिळून पार्सलचा अपहार केला. त्यातून त्यांनी आठ लाख 37 हजार रुपयांची कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 4 सप्टेंबर 2022 ते 26 जून 2023 या कालावधीत आयडेंटीफाय डिलेव्हरी सर्विसेस प्रा. ली. एमआयडीसी चिंचवड येथे घडली.
झोनल मॅनेजर सुरेंद्र जगदीश शर्मा यांनी याप्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिजनल मॅनेजर विनोद राखे, क्लस्टर मॅनेजर निलेश डांगे, हब इनचार्ज सम्राट ठुबे, डिलिव्हरी बॉय मयूर जीलबेली, डिलिव्हरी बॉय ओंकार शिंदे (रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद राखे, सम्राट ठुबे, निलेश डांगे हे कंपनीचे जबाबदार नोकर आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीत आलेल्या पार्सलचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. ऑडिटमध्ये त्याची किंमत पाच लाख 77 हजार 177 एवढी होती. त्याचबरोबर दोन लाख 60 हजार 731 रुपये रोख रकमेचा देखील अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींनी एकूण आठ लाख 37 हजार 908 रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.











































