कुरिअर कंपनीतून ग्राहकांनी मागवलेले 23 मोबाईल पळवले

0
549

काळेवाडी, दि. १९ (पीसीबी) – ग्राहकांनी ऑनलाईन माध्यमातून मागवलेले 23 मोबाईल फोन कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून कामगार आणि त्याच्या साथीदारांनी चोरून नेले. याप्रकरणी एका कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत इन्स्टाकार्ट सर्विस प्रा ली. काळेवाडी येथे घडली.

आशिष भाऊसाहेब भोसले (वय 22, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि अन्य एक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला इन्स्टाकार्ट सर्विस या ऑनलाईन कुरिअर कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीत आशिष हा काम करतो. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेल्या बिग बिलियन डे निमित्त नागरिकांनी ऑनलाईन खरेदी केली. त्यामुळे ऑनलाईन कुरिअर कंपन्यांचा ताण वाढला. इन्स्टाकार्ट सर्विसेस या कंपनीत देखील कामाचा ताण होता. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी आशिष आणि त्याच्या साथीदारांनी कंपनीच्या कार्यालयातून 6 लाख 57 हजार 107 रुपये किमतीचे 23 मोबाईल फोन चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.