कुदळवाडी टीपी स्किम रद्द होणार, ग्रामस्थांचे शिष्टमंडळाला शब्द

0
5
  • आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन, आयुक्त शेखर सिंह यांची ग्वाही

पिंपरी, दि. ९ – कुदळवाडी येथील टीपी स्किम रद्द करण्याची ग्वाही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ग्रामस्थांना दिली आहे. दरम्यान, या विषयावर आमदार महेश लांडगे यांनीही कुदळवाडी ग्रामस्थांनी मिळून साकडे घातले आणि महापालिकेने केलेला ठराव रद्द करण्याची मागणी केली. आमदार लांडगे यांनी देखील भुमिपूत्रांना विश्वासात न घेता असे परस्पर निर्णय घेण्याला आपला विरोध असून मी स्वतः जातीने लक्ष घालून तो निर्णय रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार केला.

महापालिकेने कुदळवाडी ३८० हेक्टर आणि चऱ्होली येथे १४५० हेक्टर क्षेत्रावर मिळून सहा टीपी स्किम योजनेचा ठराव केला. त्या संदर्भातील ठराव महापालिका सभेत आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर करून घेतला. तीन महिन्यांपूर्वी कुदळवाडी येथील अतिक्रमण कारवाई मागे बांगलादेशी घुसखोरीचे कारण नव्हते तर टीपी स्किम योजनेचा कुटील डाव होता, असा आरोप करण्यात आला. गावकऱ्यांनी मिळून या विषयावर आक्रमक भुमिका घेतली आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. पीसीबी टुडे च्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला. चऱ्होली येथील शेतकऱ्यांनीही माजी महापौर नितीन काळजे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली होती.

दरम्यान, खुद्द आमदार महेश लांडगे यांनी आपला या टीपी स्किमला विरोध असल्याचे जाहीर केले. स्थानिक शेतकऱ्यांनी विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही योजना होणार नाही. आपल्यालासुध्दा या निर्णयाची माहिती नव्हती, प्रशासनाने परस्पर हा निर्णय घेतला, असेही आमदार लांडगे यांनी जाहीर केले.

कुदळवाडी ग्रामस्थांनी दोन स्वतंत्र बैठका घेऊन कृती समिती स्थापन केली आणि आज लेखी निवेदन दिले. आमदारा लांडगे य़ांनी गावकऱ्यांना आपली भूमिका सांगितली आणि मीच तो टीपी रद्द करून आणनार आहे, असे आश्वासन दिले. आयुक्त शेखर सिंह हे पॅरिस दौऱ्यावरून नुकतेच शहरात आले होते, त्यांनाही निवेदन देण्यासाठी दिनेश यादव यांच्यासह शिष्टमंडळ भेटले. टीपी रद्द करणार अशी तोंडी ग्वाही त्यांनी दिली.