दि. ५ ( पीसीबी ) – बांगलादेशी, रोहिंगे यांना हाकलण्यासाठी कारवाईचे निमित्त करून तीन महिन्यापूर्वी कडेकोट पोलिस बंदोबस्तात कुदळवाडीत बुलडोझर कारवाई करण्यात आली. प्रत्यक्षात ही कारवाई बांगलादेशी किंवा रोहिंग्यांसाठी नव्हे तर टीपी प्लॅनसाठीच असल्याचे महापालिकेने इरादा जाहीर केल्यावर ग्रामस्थ संतापले आहेत. कुदळवाडीतील ग्रामस्थांची यात प्रचंड बदनामी झाली, लाखो बेरोजगार झाले, साडेचार हजारावर उद्योगधंदे बंद पडले, कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आणि आता टीपी योजनेसाठीच हे कारवाईचे कुभांड रचल्याचे उघड झाल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी विठ्ठल रुक्मिनी मंदिरात यासंदर्भात बैठक झाली आणि टीपी स्किमला विरोध करण्यासाठी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय करण्यात आला. आमचा जीव गेला तरी बेहत्तर पण टीपी स्किम होऊ देणार नाही, अशा अत्यंत कठोर शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या. महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून टीपी स्किमचे जाहीरात यावेळी जाळण्यात आली. आम्हाला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कऱणाऱ्यांचाच आम्ही खात्मा करू असा पवित्रा सर्वांनी घेतल्याने वातावरण तापले.
सकाळी सुरू झालेल्या या बैठकित जोरदार भाषणे झाली.
टीपी ला विरोध करायचा असे ठरले. यापूर्वी चिखली कुदळवाडीच्या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणात मोठे क्षेत्र गेले. स्वस्त घरकूलासाठी १०० एकर क्षेत्र घेतले. आता कुठे बरे चालले होते तर टीपी योजना आणली. कारवाईला सर्व स्थानिकांनी मिळून एकमुखाने विरोध करायचे ठरले आणि त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजू, असा इशाराही देण्यात आला. आता टीपीस्किम करून भूमिहिन करणार असाल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही, असे निक्षून सांगण्यात आले.
बैठकिसाठी भाजपचे युवा कार्यकर्ते दिनेश यादव, जेष्ठ उद्योजक बाळासाहेब यादव, लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, मराठा महासंघाचे उदय पाटील यांच्यासह युवराज पवार, दिलीप यादव, रमेश मोरे, दत्तूनाना मोरे, शैलेष मोरे, बाळासाहेब हरगुडे, गुलाबराव बालघरे, कोंडिबा यादव, विशाल बालघरे, कमालकर बालघरे, मनोज मोरे, दादासाहेब मोरे, गणेश यादव, नितेश मोरे, माऊली मोरे, सुदाम पवार, विशाल नेवाळे, तानाजी बालघरे, राहुल यादव, संभाजी यादव, दीपक ठाकूर, उत्तम बालघरे, किशोर बालघरे, जितेंद्र यादव, दिलीप मोरे, बाळासाहेब मोरे आदी सुमारे ३०० ग्रामस्थ उपस्थित होते