कुदळवाडीतील भंगार दुकाने हटवा, अन्यथा…, हाऊसिंग फेडरेशनचा प्रशासनाला इशारा

0
2

चिखली, दि. 12 (पीसीबी) : कुदळवाडी परिसरातील सर्व बेकायदेशीर भंगारमालाची दुकाने, कारखाने, गोदामे यांच्यावर कारवाई करून या भागातील अनधिकृत गोदामे हटवण्यात यावीत, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे.

फेडरेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये रहिवासी झोनमध्ये चार ते पाच हजार बेकायदेशीर, अनाधिकृत, कोणतीही परवानगी न घेता भंगार मालाची दुकाने, कारखाने, गोदामे चालू आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. तसेच या ठिकाणी लोखंड बारीक करणे, प्लास्टिक जाळणे, इतर विघातक ज्वलनशील पदार्थ जाळणे, अशी कामे केली जातात. त्यामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण, तसेच नदीच्या कडेला हे व्यवसाय असल्याने जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व बेकायदेशीर गोष्टीमुळे या ठिकाणी मागच्या एका वर्षामध्ये ४० वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. ९ डिसेंबर रोजी कुदळवाडी मधील गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी देखील महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये आवाज उठवून याकडे मुख्यमंत्री तसेच सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. इथली सर्व बेकायदेशीर दुकाने, कारखाने, स्क्रॅप गोडाऊन त्याच्यावर कारवाई करून अनधिकृत गोदामे काढावेत. यामुळे नागरिकांचे प्रदूषणापासून संरक्षण होईल.

कारवाई न केल्यास आंदोलन
सोसायटी फेडरेशनकडून आमदार महेश लांडगे, पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच मनपा कडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही यावर डोळेझाक करून कोणतीही कारवाई केली जात नाही. मनपा प्रशासनाने पुढील महिन्याभरात या सर्व बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई न झाल्यास आमच्या फेडरेशन तर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरामध्ये हजारो बेकायदेशीर स्क्रॅपची दुकाने, गोडाऊन, शॉप्स आहेत. या ठिकाणी बेकायदेशीरपणे रबर, प्लास्टिक इतर ज्वलनशील पदार्थ जाळले (Kudalwadi Fire) जातात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. तसेच, या ठिकाणी अनेक अनाधिकृत धंदे देखील चालवले जातात याबाबत वारंवार तक्रार करून देखील मनपा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अन्यथा फेडरेशन मार्फत मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिला.