२४ मार्च ( पीसीबी ) – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप शोमध्ये केलेल्या विडंबनामुळे कॉमेडियन कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाला. पण त्याच्या स्टुडिओवर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिंदे गटावर प्रथम कारवाईची मागणी करत हल्लाबोल केला आहे.
कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप शोमध्ये बॉलिवूड गाण्याच्या चालीवर महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर भाष्य करत विडंबन केलं. ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील भोली सी सूरत या गाण्यावर आधारित गाण्यात त्याने शिवसेना फुटीचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं.
या विडंबनानंतर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी राहुल कनाल यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी कनालला पहाटे अटक केली. मात्र त्याचवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कामराविरोधातही गुन्हा दाखल केला.
या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं, “जर कुणालने काही चुकीचं केलं असेल, तर कायद्याने त्याच्यावर कारवाई होईल. पण शिवसैनिकांनी स्टुडिओत घुसून केलेली तोडफोड, शिवीगाळ ही गुंडगिरी आहे. आधी या सगळ्यांवर FIR करायला हवा.”
त्यांनी स्पष्ट केलं की, “आपण लोकशाहीत राहतो, इथे कायद्याचे राज्य असायला हवे. हॉटेलचं नुकसान भरून देण्याची जबाबदारी शिंदेंची आहे.”
गाणं आणि वक्तव्यामुळे पेटलेला वाद
कुणाल कामराच्या कार्यक्रमातील गाण्याच्या ओळी, “ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी, आंखो में चश्मा, मेरी नजर से देखो तो गद्दार नजर…” अशा होत्या. यातून त्याचा रोख स्पष्टपणे शिंदेंकडे असल्याचे दिसून आले. यासोबतच त्याने शिवसेना, भाजप, एनसीपी यांच्यातील फुटीवर उपहासात्मक टिप्पणी केली होती. या भाष्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे.