कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवाल

0
2

दि.१२(पीसीबी)-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) जाहीर केला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सदर जीआरच्या अंमलबजावणीमुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांना ‘कुणबी’ जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या नियमावलीनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, याबाबत सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. अनेकांना याविषयी अजूनही संभ्रम असल्याने, नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक ती सर्व माहिती मिळावी, यासाठी सरकारने ही SOP जाहीर केली आहे.

गावपातळीवर विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत सचिव आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे. संबंधित समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे सक्षम प्राधिकरणाकडून जात प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे? आणि अर्जाची प्रक्रिया कशी असेल?
अर्जदाराने जात प्रमाणपत्रासाठी थेट उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज सादर करावा. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची पडताळणी स्थानिक पातळीवरील समितीकडे सुपूर्द केली जाईल. या समितीमार्फत अर्जदाराची वंशावळी तपासली जाईल. तसेच अर्जासोबत जोडलेले जुन्या जमीन नोंदी, ग्रामपंचायतीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, वाडवडिलांची नोंदवही यांसारख्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेला अहवाल उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठवला जाईल. या अहवालाच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय उपविभागीय अधिकारी घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणामध्ये जात प्रमाणपत्र काढण्याची नियमावली, चौकशी प्रक्रिया, अहवाल लेखनाचे निकष यासारख्या महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया
1) मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज करावा.
२) उपविभागीय अधिकारी या अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवेल
3) ही समिती अर्जदाराची वंशावळ तपासणी करेल
4) यानुसार जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी यांसारखे कागदपत्र तपासले जातील
5) चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी हे अर्जदाराला प्रमाणपत्र देण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय घेतील

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) जर अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक.
2) वरील पुरावा उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.
3) अर्जदाराच्या गावातील किंवा कुलातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक.
4) याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.